अध्यात्म,आयुष्य आणि विज्ञान


आपण आपल्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या समस्या, प्रश्न अथवा दु:खांनी ग्रासलेलो असतो. एकही प्रश्न, समस्या किंवा दु;ख नाही, असा माणूस मिळणं अशक्यआहे. या सर्वांवर मात करत, त्यातून मार्ग काढत आयुष्याची ध्येय गाठायची आपली धडपड सदैव सुरू असते. कधीकधी कोणतंही ध्येय गाठण्यासाठी नाही, तर मनाला उभारी मिळण्यासाठी, मन प्रसन्न राहावं यासाठी, आपण काही तरी साध्य करायचा प्रयत्न करत असतो. मात्र, आयुष्यात एक काळ असा येतो की, आपल्या प्रयत्नांना एकामागून एक अशा अपयशांच्या मालिकेला सामोरं जावं लागतं, नुकसानाला,अपमानाला सामोरं जावं लागतं. आपली काहीही चूक नसताना कोणाकडून तरी खूप ऐकून घ्यावं लागतं. एकही गोष्ट ठरवल्याप्रमाणे पार पडत नाही, तेव्हा आपला धीर सुटायला लागतो, आत्मविश्वास डळमळतो आणि मग हा प्रश्न पडतो की, माझ्याच बाबतीत हे का घडतंय?, मलाच का भोगावं लागतंय?, माझ्यावरच का अन्याय होतोय?

आता अशावेळी अध्यात्म सांगतं की, आपल्याबाबतीत हे जे काही घडतंय, ते आपल्या पूर्वकर्माचं फळ आहे. मन अध्यात्मात घाला. देवाचं नामस्मरण करत राहा. मन शांत करण्यासाठी ध्यानधारणा करा. यातून बाहेर पडाल. यापैकी काहीही चूक नसलं, तरी आधीच उद्विग्न असलेल्या मनस्थितीत काही नवे प्रश्न आपल्या मनाला सतावतात आणि मनाची उद्विग्नता आणखीनच वाढते. प्रश्न असा पडतो की, जर देवाच्या इच्छेशिवाय पानही हलत नाही, तर मग हे सगळं जे घडतंय तेही त्याचाच इच्छेने घडतंय. मग तो असं का करतो? कधी सुख तर कधी दु:ख का देतो? समाजात गरीब-श्रीमंत ही दरी का आहे? सज्जनांच्या बरोबरीनेच दुर्जन का आहेत? थोडक्यात जगात सर्वत्र असंतुलन का आहे? सर्व प्राणीमात्र, सृष्टी निर्माण होते आणि लयाला जाते, मग सर्वांना निर्माण करणारा तो स्वत: कधी निर्माण झालेला नाही आणि तो कधीच लयालाही जात नाही, असं आपले वेद, उपनिषदं आणि पुराणं सांगतात म्हणजेच अध्यात्म सांगतं, त्याचा नेमका अर्थ काय?

या प्रश्नांची उत्तरं जर आपल्याला सोप्या पद्धतीने समजून घ्यायचा  प्रयत्न करायचा असेल, तर त्यासाठी विज्ञानातल्या  आणि गणितातल्या काही सिद्धांतांचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. विज्ञानातला प्रसिद्ध सिद्धांत आपल्याला माहीत आहे की, "Energy can not be created or destroyed, it can only change from one form to another". अर्थात, ऊर्जा नव्याने तयार करता येत नाही, तिचा विनाश करता येत नाही, तर फक्त एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात परावर्तीत होऊ शकते. म्हणजेच परमेश्वर अनादी-अनंत आहे, त्याला उगम आणि अंत नाही. त्यामुळे तो स्वत: कधी निर्माण झालेला नाही आणि तो कधीच लयालाही जात नाही. तो परमात्मा वेगवेगळ्या सजीव शरीरांमध्ये आणि निर्जीव स्वरूपांमध्ये परावर्तीत होऊन विखुरला जातो. म्हणूनच सजीव असलेल्या रेड्याच्या तोंडून वेद म्हणवून घेणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींनी निर्जीव भिंतही चालवून दाखवली.  या उदाहरणांमधून अध्यात्म जे सांगतं किंवा भगवद्गीतेत श्रीकृष्णाने जे सांगितलं आहे की, या सर्व चरा-अचरात मी आहे, ते कसं याचा अर्थ आपल्या लक्षात येतो. आता समाजात असंतुलन किंवा दरी का आहे, याचा अर्थ लावायचा प्रयत्न करूया. ऊर्जा म्हटलं की ती काहीही कार्य न करता राहू शकत नाही. यालाच भगवद्गीतेत श्रीकृष्णाने नैष्कर्म्यवाद म्हटला आहे. कोणतेही कर्म केल्याशिवाय तू राहू शकत नाहीस, हेच श्रीकृष्णाने अर्जुनाला समजावून सांगितलंय. आता जर ऊर्जेकडून कार्य व्हायचं असेल, तर स्थिरता असणं शक्य नाही. त्याकरता होणाऱ्या कार्यामुळे सतत कशाचे तरी वहन होणे गरजेचे आहे. परंतु पाणी असो अथवा वीज अथवा अन्य काही, ते तेव्हाच वाहतात, जेव्हा दोन पातळ्यांमध्ये फरक असतो . वरच्या पातळीकडून खालच्या पातळीकडे पाणी अथवा वीज वाहते. म्हणजेच त्यासाठी असंतुलनाची गरज असते. श्रीमंतांकडून गरीबांना केलं जाणारं दान म्हणजेच लक्ष्मीरूपी ऊर्जेचं वहन असतं. अशाप्रकारे चंचल लक्ष्मी वाहती-फिरती राहिल्यामुळेच अर्थचक्र सुरू राहतं. म्हणजे पुन्हा एकदा अर्थशास्त्र आणि अध्यात्म यांचं नातं स्पष्ट होतं. तसंच असंतुलनाची गरजही स्पष्ट होते. असा हा अनादी-अनंत असलेला परमेश्वर परिपूर्ण आहे. कारण त्यात या असंतुलनाच्या माध्यामातून गरीब-श्रीमंत, सज्जन-दुर्जन, प्रकाश आणि अंधार अशी सर्वच प्रकारची Positivity आणि Negativity म्हणजे गणिताच्या भाषेत सांगायचं तर धनता आणि ऋणता सामावलेली आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर Positive Infinity आणि Negative Infinity सामावलेली आहे. आपण नेहमी शून्याचा अर्थ "काही नाही", असा चुकीचा लावतो. पण खरंतर शून्य म्हणजे परमेश्वराप्रमाणे सर्वकाही सामावलेलं आहे, म्हणूनच Positive Infinity मध्ये Negative Infinity मिळवली की, उत्तर शून्य येतं आणि शून्य हे इतकं मोठं असल्यामुळेच शून्याच्या तुलनेत नगण्य असलेल्या इतर कोणत्याही संख्येला शून्यासारख्या इतक्या मोठ्या संख्येने भागणं हे meaningless म्हणजेच अर्थशून्य आहे, कारण शून्याच्या तुलनेत नगण्य असलेल्या त्या संख्येला शून्याने भाग कसा जाणार? त्याप्रमाणेच शून्यासारख्या इतक्या मोठ्या संख्येसमोर कोणतीही संख्या नगण्यच असल्याने नगण्य संख्येने भागल्यानंतर उत्तर आहे तीच संख्या म्हणजेच शून्यच येणार.

अध्यात्म,आयुष्य आणि विज्ञान यांच्यातल्या नात्याचा गुढार्थ बृहदारण्यकातल्या पाचव्या अध्यायातल्या श्लोकाच्या माध्यमातून आपल्याला सांगितला आहे-

ॐ पूर्णमद:पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्चते।

पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ।।

Comments

  1. Khup chhan lihilay sir..waiting for more

    ReplyDelete
  2. पूर्ण चा अर्थ शून्य न घेता अनंत घ्यावा.

    ReplyDelete
  3. छान लिहिले आहे

    ReplyDelete
  4. Waa Sir . Chaan explain kelay. Waiting for many more.

    ReplyDelete
  5. खूप छान लिहिलंय. अध्यात्मामधलं विज्ञान आकळलं तर जीवन खरंच समृद्ध होईल.

    ReplyDelete
  6. मस्त लिहिलंय सर

    ReplyDelete
  7. मनोज
    अभ्यासपूर्ण लेख !! छान लिहिले आहेस !! 👌👌👍👍

    ReplyDelete
  8. वाह!! मस्त connection !!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Stress Management, Science and Spirituality

ताण व्यवस्थापन, विज्ञान आणि अध्यात्म